एनए प्रक्रियेत काय बदल झाले?
- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 नुसार जमिनीच्या अकृषिक (एनए) वापरासाठी परवानगी देण्यात येते.
- कालांतराने या कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणा कलम 42 (ब), (क) आणि (ड) अशाप्रकारे ओळखल्या जातात. या सुधारणांमुळे जमिनीच्या अकृषिक (एनए) परवानगीच्या कार्यपद्धतीत बदल झाला आहे.
- या संदर्भातला शासन निर्णय महसूल आणि वन विभागानं 13 एप्रिल 2022 रोजी जारी केला आहे.
- त्यात नमूद केलयं की, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 (ब) या सुधारणेनुसार, जर तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रामध्ये अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध झाला असेल, तर अशा क्षेत्रातील जमीन एनए करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही.
- कलम 42 (क) या सुधारणेनुसार, तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार करण्यात आली असेल आणि ती मान्य करण्यात आली असेल, तर या क्षेत्रातील जमिनींचा वापर अकृषिक कारणांसाठी केला जाऊ शकेल.
- तर, कोणत्याही गावाच्या हद्दीपासून ज्यांची जमीन 200 मीटरच्या आत आहे, अशा शेतमालकांना एनए परवानगीची असणार नाही, अशी सुधारणा कलम 42 (ड)मध्ये करण्यात आली आहे.
- पण, आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती म्हणजे या तिन्ही सुधारणांनुसार संबंधित क्षेत्रात एनए परवानगी गरजेची नसली तरी जमिनीचा अकृषिक कारणांसाठी वापर करायचा असल्यास प्रशासनाकडून तसा दाखला घेणं गरजेचं आहे.
- त्यासाठी तहसील कार्यालयात रितसर अर्ज करून, त्यासाठीचं रुपांतरण कर भरून तहसीलदारांकडून कायदेशीर सनद घेणं गरजेचं आहे.
तहसीलदारांकडून मिळणारी सनद वरच्या फोटोमध्ये दाखवण्यात आली आहे. - काय काळजी घ्यायची?
- जमीन एनए करण्यासाठी अर्ज करताना तुमची जमीन कोणत्या क्षेत्रात येते आणि त्यासाठी महसूल संहितेतील कोणती कलम लागू होते, यानुसार कागदपत्रं लागतात, असं महसूल तज्ञ डॉ. संजय कुंडेटकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
- उदा. जर तुम्हाला गावठाण क्षेत्रापासून 200 मीटरच्या आतील जमिनीचा एनए करायचा असेल, तर जमिनीचा सातबारा उतारा, फेरफार उतारा आणि ग्रामपंचायतीचं गावठाण पत्र ही कागदपत्रं अर्जासोबत जोडायची.
- हा अर्ज तहसीलदारांकडे दिला तर ते सांगतील तितका कर भरायचा आणि मग अकृषिक वापराची परवानगी देणारी सनद तुम्हाला तहसीलदारांकडून दिली जाईल.
- त्यामुळे मग आपली जमीन कोणत्या क्षेत्रात येते, त्यानुसार एनए करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागतील, याची माहिती तहसील कार्यालयातून घेणे अधिक सोयीचे ठरेल.