lpg price today 1 जानेवारी 2025 रोजी घरगुती गॅस सिलेंडरसह व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती अपडेट झाल्या आहेत. नवीन वर्षात ग्राहकांसाठी आनंदवार्ता दाखल झाली आहे. किंमतीत मोठा दिलासा मिळाला आहे. काय आहेत आता बदललेल्या किंमती?
नवीन वर्षात मोठी आनंदवार्ता आली आहे. देशात जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. अर्थात घरगुती गॅसच्या आघाडीवर ग्राहकांना अगोदरच दिलासा मिळालेला आहे. गेल्यावर्षी मार्च 2024 मध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत घसरण झाली होती. आता व्यावसायिक गॅसच्या किंमतीत मोठी घसरण आली आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस कंपन्या किंमती अपडेट करतात. आता या वर्षाच्या पहिल्या महिन्यात असा आहे भाव…
घरगुती गॅस सिलेंडरचा भाव काय?
14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत एप्रिल महिन्यापासून स्थिर आहेत.400 रुपयांचा गॅस मोदी सरकारच्या काळात तिप्पट झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर 9 मार्च 2024 रोजी घरगुती गॅसच्या किंमतीत कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 1100 रुपयांहून गॅस दर खाली घसरले. आता दिल्लीत घरगुती गॅसची किंमत 803 रुपये, कोलकत्त्यात 829 रुपये, मुंबईत हा दर 802.50 रुपये, तर चेन्नईत घरगुती गॅसची किंमत 818.50 रुपये आहे. उज्ज्वला सिलेंडर योजनेतील ग्राहकांना सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी देण्यात येते.
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत घसरण
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली. जुलै महिन्यापासून हे दाम चढेच होते. गेल्या जवळपास 6 महिन्यानंतर घसरण दिसली. देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 14.5 रुपयांची घसरण झाली. येथे गॅस किंमत 1,804 रुपये झाली. तर कोलकत्तामध्ये 16 रुपयांच्या घसरणीसह भाव 1,911 रुपये झाले. मुंबईत 15 रुपयांच्या घसरणीसह भाव 1,756 रुपयांवर आले. चेन्नईत 14.5 रुपये घसरणीसह 1,966 रुपये झाले आहेत.
5 महिन्यात इतका महागला सिलेंडर
गेल्या पाच महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ झाली. जुलै ते डिसेंबर या काळात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत दिल्लीमध्ये 172.5 रुपयांची दरवाढ नोंदवण्यात आली. तर कोलकत्ता आणि चेन्नईमध्ये 171 रुपयांनी भाव वधारला. मुंबईत 173 रुपयांनी भाव वाढले.
डिसेंबर महिन्यात सलग पाचव्यांदा दरवाढ झाली होती. 19 किलो एलपीजी सिलेंडरच्या किंमती 16.50 रुपयांनी वाढल्या होत्या. या दरवाढीनंतर देशातील चार प्रमुख शहरातील व्यावसायिकांना गॅस सिलेंडरसाठी जादा किंमत मोजावी लागली. त्यानुसार, दिल्लीत गॅस सिलेंडर 1818.50 रुपये, तर मुंबईत 1771 रुपये, कोलकत्तामध्ये 1927 रुपये आणि चेन्नईत 1980 रुपयांना गॅस सिलेंडरचा भाव झाला होता.